गंगेच्या किनारी
१/१/९६
ओढ्याकाठच्या डागवनात गंगेच्या किनारी
दाट झाडाझुडुपांमध्ये पिकल्यात बोरी
येति न्हालेल्या पोरी ।।१।।
खाली बाभळीची सावली वर पाखरांची गाणी
गुराख्यांची पाऊलवाट कोल्ह्यांना असे चोरी
येति न्हालेल्या पोरी ।। २ ।।
हळू टाका पाउल धांड मोडला नाजूक
पोटऱ्यात आली हिरवीगार ज्वारी
येति न्हालेल्या पोरी ।। ३।।
बांधाबांधानेच चला काटा टोचेल अंगाला
लाल पिवळ्या फुलांचा कार्ड फुलला काटेरी
येति न्हालेल्या पोरी ।। ४ ।।
दोन हिरव्या पाथ्यामध्ये बेल अस्तवात गेला
पिवळ्याधमक गोळ्यांनी देह भारावला
गाभुळत्या शेंदडाची चवच न्यारी
येति न्हालेल्या पोरी ।। ५।।
थट्टा करील पायाची हरभरा अमुसला
आम जाईल निघून पाण्यात बुडवा त्याला
टच भरून घाट्यात हाक हाताला तो मारी
येति न्हालेल्या पोरी ।। ६ ।।
अशी नटली हि माती ऊत आलाय अंगाला
रंगरंगात भरतीचा हिवाळा आसुसला
गोडगुलाबी उबीचे मनि स्वप्न नाचते भारी
येति न्हालेल्या पोरी ।। ७ ।।
Comments
Post a Comment